Bhimraya ghe lyrics

Bhimraya ghe lyrics


भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना lyrics

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना

दुमदुमे 'जयभीम' ची, गर्जना चोहीकडे
सारखा जावे तिथे, हा तुझा डंका झडे
घे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना

कोणते आकाश हे,  तू अम्हा नेले कुठे,
तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे
या भरा-या आमुच्या,  ही पाखरांची वंदना 

कालचे सारे मुके, आज बोलू लागले
अन तुझ्या सत्यासवे, शब्द तोलू लागले
घे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना

जाळले गेलो तरी, सोडले नाही तुला
कापले गेलो तरी, तोडले नाही तुला
ही तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना

तू उभा सूर्यापरी, राहिली कोठे निशा
एवढे आम्हा कळे, ही तुझी आहे दिशा
मायबापा  घे उद्याच्या अंकुरांची वंदना

धम्मचक्राची तुझ्या, वाढवू आम्ही गती
हा तुझा झेंडा आम्ही, घेतलेला सोबती
ऐक येणा-या युगांच्या आदरांची वंदना

---सुरेश भट 
close